मुंबई पदवीधर निवडणूकी साठी डॉ. दीपक पवार यांना युवा भारत संघटनेचा पाठींबा!

मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार डॉ. दीपक पवार यांना त्यांच्या मराठी भाषेच्या कार्यासाठी केलेल्या वैयक्तिक आणि संस्थात्मक कामामुळे युवा भारत संघटना पाठींबा देत आहे       

 

डॉ. दीपक पवार यांना पाठींबा देण्याचे मागे वरील कारणासोबत पुढील काही कारणे आहेत.

१) बहुतेक पदवीधर आमदार फक्त निवडणुकींच्या वेळीच पदवीधरांचे प्रश्न आणि समस्या बोलत असतात आणि निवडून आल्यावर काहीच करत नाही आणि ही साखळी नेहमी चालूच राहते. त्याला छेद मिळावा म्हणून आम्ही डॉ. दीपक पवार यांच्यासारख्या होतकरू उमेदवाराला पाठींबा देत आहोत.

२) सगळ्याच निवडणुकीप्रमाणेच पदवीधर निवडणुकीत सुद्धा गर्भश्रीमंत उमेदवार पैसा वापरत असतात आणि निवडून येतात. निवडून आल्यावर ते पदवीधरांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यापेक्षा गेलेला पैसा दुप्पट कसा मिळवता येईल एवढाच विचार करत असतात असे नेहमी होवू नये म्हणून आम्ही सर्वसामन्य लोकांचे सर्वसामन्य आणि प्रामाणिक उमेदवार डॉ. दीपक पवार यांना पाठींबा देत आहोत.

३) राजकारणाचे गुन्हेगारीकरण माघील वर्षांमध्ये खूपच झपाट्याने झाले आहे त्यामुळे कोणतीही  आम्ही कोणत्याही गुन्हेगारीची, फसवाफसवीची आणि बनावटीकरणाची पार्श्वभूमी नसलेले डॉ. दीपक पवार यांना पाठींबा देत आहोत.

४. आपल्या आजूबाजूला असे अनेक पक्ष आहेत की, जे  मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या प्रेमाच्या नावाने ढोल बडवत असतात पण व्यवहारात मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, विकासासाठी, भविष्यासाठी त्यांच्याकडे काहीच व्यूहरचना आणि दृष्टीकोन नसतो. त्यातुलनेत डॉ. दीपक पवार मराठी भाषेच्या, मराठी माध्यमाच्या चळवळीचे बिनीचे शिलेदार आहेत. मराठी भाषा जगली पाहिजे, टिकली पाहिजे आणि ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून ते महाराष्ट्रभर कार्यशाळा, प्रबोधन सत्र, बैठका घेत असतात त्यामुळे आम्ही त्यांना पाठींबा देत आहोत.

 

युवा भारत संघटनेच्या काही मागण्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे;

१) मराठीला ज्ञानभाषा करणाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील महानुभाव धर्माचा आणि त्यांचे सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे महानुभाव धर्माच्या पावनभूमीत म्हणजे श्रीक्षेत्र रिध्दपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यात यावे.

२) मराठी माध्यमातील शाळांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी त्यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच सरकार दरबारी मराठी माध्यमाच्या शाळेंना जी सापत्न वागणूक दिली जाते ती थांबविली पाहिजे.

३) मोठ्या प्रमाणात पदवीधर विद्यार्थी-विद्यार्थिनी बेरोजगारीग्रस्त आहेत त्यातून वैफल्यता, नैराश्य वाढत जावून विकृतीग्रस्त आणि विकारग्रस्त होत आहेत. त्यामुळे समाजाचे ‘सामाजिक-मानसिक आरोग्य’ खालावत आहेत म्हणून सर्व प्रकारच्या भरत्यांवरील बंदी सरकारने उठविली पाहिजे.

४) शैक्षणिक क्षेत्रात वाढत जाणारा सरकारी हस्तक्षेप कमी होवून शैक्षणिक क्षेत्राची स्वायतत्ता जपली गेली पाहिजे . अन्यथा शैक्षणिक क्षेत्र हे ‘ज्ञान-तत्वज्ञान आणि विज्ञानाचे क्षेत्र’ न राहता  ‘पक्षीय हितसंबंधाचे, स्पर्धेचे क्षेत्र’ बनेल.

५) बंद पडत जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्या चालू ठेवल्या पाहिजेत. दलित, भटके विमुक्त, आदिवासी, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागास समूह आणि विशेषत: स्त्रिया यांच्या शिक्षणासाठी नवनवीन शिष्यवृत्या सुरु करून त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी केली पाहिजे.

६) एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत शिक्षणावरील खर्च भारत सरकार आणि  राज्य सरकार दिवसेंदिवस कमी कमी करत आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण होत आहेत म्हणून शिक्षणावरील खर्च वाढविण्यात यावा.

Leave a comment