पुरुषांनी आपली जात दाखवत स्री जातीवरती केलेल्या पाशवी अत्याचाराचा जाहीर निषेध.

 

कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर (छकुली) सामुहिक बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली. पुरुषसत्ताक व्यवस्थेचे वर्चस्व भारतीय समाजात वाढल्यापासून स्री जातीवरील अन्याय, अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच त्यांचे स्वरूपही अत्यंत विकृत व अमानुष होताना दिसत आहे. स्री ही एक उपभोग्य वस्तू बनलेल्या समाजात ती उच्च शिक्षीत असो वा निरक्षर, व्यावसायिक असो वा कष्टकरी-कामगार-मजूर, बालिका असो वा वयोवृद्ध, अपंग, मतिमंद तरुणी असो वा आश्रम शाळेतील विद्यार्थिनी, तोकड्या कपड्यातील स्वतःला आधुनिक म्हणवणारी तरुणी असो वा पूर्ण अंग झाकून घेतलेली शालीन, कुलीन ठरवलेली पारंपरिक स्त्री यातील कुणीच पुरुषी शोषणापासून, हिंसाचारापासून मुक्त होऊ शकत नाहीत. घरात आणि घराच्या बाहेर लैंगिक अत्याचार, बलात्कार, हिंसाचार, अन्याय, भेदभाव व स्री म्हणून मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक पदोपदी वाटयाला येत असल्याने स्त्रीचे जीवन असुरक्षित झाले आहे. त्याचीच परिणीती म्हणून आज आपण कोपर्डी येथील घटनेकडे पहिले पाहिजे.
भारतात इंग्रजांच्या काळात स्री प्रश्न हा येथील पुरुषांच्या आधुनिक व सुसंस्कृत असण्याचं परिमाण होता. स्वातंत्र्य आंदोलनानेही येथील ‘स्रीशूद्रातिशूद्र’ यांच्या मुक्तीच्या लढयाची परंपरा दुय्यम ठरविली. सर्व प्रकारच्या विषमतांना (स्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, सवर्ण-अवर्ण, श्रेष्ठ-कनिष्ठ) नाकारणाऱ्या समतामुलक, मानवतावादी श्रमण- जैन, बौद्ध, महानुभाव, लिंगायत, सुफी, वारकरी परंपरांना छेद देणारी विषमतावादी ब्राह्मणी, भांडवली मूल्यव्यवस्था व जीवनशैली समाजावर लादली गेली. ही विषमतावादी मूल्ये प्रबळ होत असतानाच स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या विषम आर्थिक विकासाची किंमतही वरील शोषित-पिडीत घटकांनाच मोजावी लागली. त्याच काळात हरित क्रांती आणि सहकारातून गब्बर झालेले जमीनदार, कारखानदार आणि व्यावसायिक यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंगंड निर्माण झालेला दिसतो. तसेच आपल्या समाजातील विषम सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्थेमुळे पराभूत मानसिकतेपोटी न्युनगंडात जगणारा एक वर्ग तयार झालेला आहे. अहंगंडातून येणारा माज व न्यूनगंडातून निर्माण होणारी असूया शेवटी कुठल्यातरी स्रीच्याच शरीराचा चावा घेऊन शमविली जाते. त्यात भर पडली आहे ती जागतिकीकरणातून आलेल्या किळसवाण्या उपभोगवादी, चंगळवादी मूल्यांची. प्रत्येक क्षणाचा पाशवी आनंद घेण्याच्या वृत्तीतूनही स्रीयांचे शोषण व अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
यवतमाळच्या प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकांकडून बालिकांचे झालेले लैंगिक शोषण असो, चंद्रपुरात बालिकेवर झालेला बलात्कार, शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांचा आरोग्य मंत्र्याच्या स्वीय सहायकाने केलेला विनयभंग व त्यानंतरची दमदाटी या सर्व प्रकाराला वैतागून डॉ. महाजन यांनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न असो, मंत्र्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ झाल्याचा नुकताच विधान परिषदेत झालेला आरोप. या सर्व घटना समाजातील स्त्रीचे जीवन असह्य होत असल्याचे निदर्शक आहे. स्रियांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत आपला समाज नेहमीच संकुचित व बीभत्स स्वरूप धारण करतो. आशा शिंदेचे किंवा कोल्हापूरच्या मेघाचे जोडीदार निवडणे असो वा खर्डा येथील प्रेमाचा बळी, निर्भयाच्या लैंगिक स्वातंत्र्यावर जबरदस्तीने घातलेला घाला असो वा कोपर्डी येथील छकुलीचे अस्तित्व नाकारणे असो यातून आपला पुरुषी समाज किती कामांध, हिंस्र व अमानुष आहे हेच दिसून आले आहे. वेगवेगळ्या जातीय वा धार्मिक दंगली असो तेथेही स्री चे शरीर हेच लढाईचे रणांगण ठरत असते.
कोपर्डी येथे घडलेली घटना ही संपूर्ण समाजमनाला हादरून टाकणारी आहे. येथे एका मुलीचा जीव गेला आहे आणि तिचा जीव घेणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे ही एक प्रामाणिक भावना आहे. आणि ही भावना समाजातील सगळ्या जात-वर्गातून तीव्रपणे व्यक्त होत आहे. परंतु तरीही या घटनेला संकुचित राजकीय उद्देशाने जातीय रंग दिला जात आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करून मराठा विरुद्ध दलित अशी दुही निर्माण करण्याचा समाजविघातक प्रयत्न अशा लोकांकडून केला जात आहे. यामुळे हा वाद फक्त दोन्ही गटातील पुरुषांच्या पुरुषी सत्तासंबंधांच्या किंवा हितसंबंधांच्या छायेखाली झाकोळून जाऊन मुळचा स्री-प्रश्न मात्र बाजूला पडण्याचीच जास्त शक्यता आहे. स्वतंत्रपणे स्री-प्रश्नांना भिडण्याची ताकद भारतीय पुरुषांच्या अंगी असलेली दिसत नाही. सतत ते स्रियांच्या शरीराची ढाल करून आपले पुरुषी हितसंबंध जोपासत असतात. स्री दास्याच्या, स्री-शोषणाच्या कारण असलेल्या मूळ सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय संरचानाना कधीही प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे कडक कायदे झाले तरी स्रीयांवर अत्याचार होत आलेले आहेत आणि यापुढील काळातही होतील अशीच परिस्थिती आहे. कारण चालू असलेल्या या वादातून किंवा पुरुषी हितसंबंधांच्या चढाओढीतून निर्माण होणारी सुडाची भावना परत एकदा कुठल्यातरी स्रियांचे लचके तोडण्यातच समाधान मानणारी असते. म्हणून या सूड चक्राची पुढची बळी ‘मी तर नसेल ना’ किंवा ‘माझ्या कुटुंबातील स्त्री तर नसेल ना’ ही भीती आपल्या समाजमनावर सतत घोंगावत राहणार आहे.
अशा परिस्थितीत कोपर्डी येथील पीडित मुलीला खरा न्याय कोणता असेल तर तो यापुढील काळात कुठल्याही मुलीवर, आईवर, बहिणीवर अत्याचार होणार नाहीत असा समाज निर्माण करणे होय. त्यासाठी आपल्या समाजातील पुरुषसत्तेचा, पुरुषी मानसिकतेचा बिमोड करणे, कुठल्याही जात-वर्गातील घटकांमध्ये अहंगंड निर्माण होणार नाही किंवा ते न्यूनगंडाचे शिकार होणार नाहीत असा संतुलित आर्थिक-सामाजिक विकास घडवून आणणे, बाजारू व उपभोगवादी मूल्यांना विरोध करणे किंवा त्यांचा उच्छेद करणे गरजेचे आहे. स्री च्या व्यक्ती म्हणूनच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मान राखला पाहिजे.

 मुळापासून स्री-प्रश्न सोडविला जावा अशी प्रबळ इच्छाशक्ती आजपर्यंत कुठल्याही राज्यकर्त्यांची नव्हती व आजही असलेली दिसत नाही. सरकारने एखादा कायदा केला तरी त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आ वासून उभा असतोच. त्यामुळे आपल्या दृष्टीने महात्मा फुले, ताराबाई शिंदे, छत्रपती शाहूमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्रियांच्या मुक्तीसाठी प्रस्थापित सामाजिक-आर्थिक संरचनांविषयी जे प्रश्न उपस्थित केले तेच आज नव्याने उपस्थित करण्याची गरज आहे. स्री-पुरुष समतेसाठी व त्यांच्या सन्मानासाठी व्यक्तिगत व सामुहिक पातळीवरती प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करावेत असे आवाहन आपणा सर्वांना युवा भारत संघटनेकडून करण्यात येत आहे.

                (युवा भारत राज्य समिती  कडून जारी..)

विनोद भुजबळ ९५०३४८६०३३ सुरेश सोमकुवर ९७६६१२४५६१

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s